fbpx

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला

National service Scheme अर्थात राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ह्यांच्या समन्वयाद्वारे एक अतिशय भव्य व अभिनव उपक्रम २३ जून २०१९ रोजी पार पडला आहे. ह्या भव्य उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत १६,७३१ विद्यार्थ्यांना एकाच वेळी कडुलिंबाच्या रोपांचे वितरण करण्यात आले.

एकाच वेळी इतक्या प्रचंड संख्येने करण्यात येणारे कडुलिंबाच्या रोपट्याचे वाटप हा एक जागतिक दर्जाचा विक्रम ठरला असून ह्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. एकाचवेळी १६,७३१ रोपांचे वितरण तेही केवळ २ तास २ मिनिटांमध्ये साध्य करण्यात आले. याआधी नोंद असलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दुबईतील असून तिथे ९३७१ रोपांचे वितरण करण्यात आलेले.

devendra fadanvis, national service scheme, sppu, tree plantaion

हा भव्य सोहळा व त्याचे संपूर्ण व्यवस्थापन श्री राजेश पांडे ह्यांचे असून त्यांच्याच अथक परिश्रमाद्वारे हा भव्य सोहळा उत्तमरीत्या पार पडला . राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ह्यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे साकार होणाऱ्या ह्या उपक्रमाला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या समर्थ भारत ह्या अभियान अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या आळंदी-देहू-पंढरपूर ह्या राष्ट्रीय दिंडीला शिवाजी विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ व श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ ह्यांचेही सहकार्य लाभले आहे.

हा भव्य सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य मैदानावर सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला. आळंदी-देहू-पंढरपूर मार्गावरील हि राष्ट्रीय दिंडी पुढील चार सूत्रांवर आधारलेली असेल ती चार सूत्रं आहेत स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी आणि हरित वारी.

वितरित करण्यात आलेल्या १६,७३१ कडुनिंबाच्या रोपट्यांचे रोपण हे वारीतील मुक्कामांच्या ठिकाणी असणारे रस्ते, वनविभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणारी जागा तसेच इतर संरक्षित जागांवर करण्यात येणार आहे. ह्या वृक्षरोपणाची अंमलबजावणी व्यवस्थितरीत्या व्हावी ह्यासाठी २०० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक त्या त्या संबंधित ठिकाणी खड्डे तयार करतील व दिंडीच्या प्रस्थानानंतर त्या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात येणार आहे.

केवळ झाडे लावून काम पूर्णत्वास जाणार नाही तर त्या लावलेल्या झाडांची योग्य निगा कशी राखली जाईल ह्याचीही व्यवस्था करण्यात येणार असून त्यानुसार वृक्षारोपण केलेल्या परिसरातील राष्ट्रीय सेवा योजनेचा महाविद्यालयातील स्वयंसेवक त्या झाडांची काळजी घेईल.

devendra fadanvis, national service scheme, sppu, tree plantaion

स्वच्छता कार्यक्रम

ह्या राष्ट्रीय दिंडी अंतर्गत असणाऱ्या ३५ मुक्कामांच्या ठिकाणी ११०० रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार असून त्यातील ५०० स्वयंसेवक पत्रावळ्यांचे वाटप व उष्टावळ्यांचे संकलन करतील तसेच ह्याचबरोबर ४०० रासेयो स्वयंसेवक ओला कचरा तसेच निर्माल्य ह्याचे संकलन करतील व उर्वरित २०० स्वयंसेवक जमा केलेला ओला कचरा व निर्माल्य सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांकडे पाठवतील ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत निर्मिती करणे शक्य होईल.

निर्मल वारी

वारी निर्मल व्हावी ह्यासाठी ११०० स्वयंसेवकांपैकी १०० स्वयंसेवक वारीमुक्कामांच्या संबंधित त्या त्या ठिकाणी दिवसा व रात्रीसुद्धा तैनात असतील. आयोजक महाविद्यालये आणि सेवा सहयोग ह्यांच्या संयुक्त समन्वयातून १०० स्वयंसेवक वारकर्यांना प्रत्यक्ष मदत करतील व त्यांचे प्रबोधन करतील.

पथनाट्य प्रबोधन

प्रत्येकी १५ स्वयंसेवकांचे ५ संघ ह्याठिकाणी होणाऱ्या पथनाट्यांमध्ये सामील होणार असून ज्याद्वारे ते पुढील २० दिवसांत तब्बल १००० पथनाट्यांचे सादरीकरण करतील. पथनाट्याद्वारे २ लाख लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवणे हा ह्या पथनाट्यांचा उद्देश आहे.

स्वस्थ वारी

स्वस्थ वारी ह्या सूत्रांतर्गत ३५ ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत ज्यात वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल व त्यांना लागणाऱ्या आवश्यक साधनांचे वाटपही करण्यात येईल. वारकर्यांना तेलमालीश व फिजिओथेरपी ह्या सेवाही पुरवण्यात येणार आहेत व तसेच सुसज्ज रुग्णवाहिका वारीच्या दोन्ही मार्गांवर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

ह्या राष्ट्रीय दिंडीद्वारे खालील उद्दिष्टांची पूर्ती करण्याचा प्रयत्न असणार आहे

• २ लाख वारकरी व वारीमार्गातील गावांतील गावकऱ्यांचे प्रबोधन
• ७०० टन ओला कचरा आणि निर्माल्य संकलन
• ३५० टॅन सेंद्रिय खताची निर्मिती
• ३५ लाख लिटर दूषित पाणी जमिनीत मुरणार नाही व सुमारे तेवढ्याच पाण्याची बचत सुद्धा होईल
• १६,७३१ वृक्षांचे रोपण व त्यांचे संवर्धन
• १ लाख वारकऱ्यांची आरोग्यतपासणी व १ लाख चष्मा वाटप तसेच ३५ हजार वारकर्यांना फिजिओथेरपी सेवेचा लाभ देणे

Comments are closed.