fbpx

वेटर ते पोलिस उपनिरीक्षक, कोल्हापूरच्या पठ्याचा संघर्षमय प्रवास

Source - Maharashtra Times

“जिद्द असेल तर काय अशक्य आहे” असे आपण नेहमी म्हणत असतो, पण ह्या पठ्याने हे वाक्य अक्षरशः जगले आहे, हे वाक्य खरे करून दाखवले आहे. ह्या व्यक्तीचे नाव आहे संदीप नामदेव गुरव. उत्पनाचे साधन केवळ अर्धा एकर शेती आणि दुग्ध व्यवसाय. अश्या बिकट परिस्थितीत पुढचे शिक्षण घेणे कठीण होते. म्हणून संदीप ह्यांनी आठवीनंतर शिक्षणाला रामराम ठोकला व ते एका हॉटेलवर वेटरची नोकरी करू लागले.

पण मनातली उर्मी काही स्वस्थ बसू देईना, अखेर वेटरची नोकरी सोडून त्यांनी पुन्हा शिक्षण घेणे सुरु केले, आणि पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत इतर मागासवर्ग ह्या प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावून हि परीक्षा ते उत्तीर्ण झाले. ह्या परीक्षेत संपूर्ण राज्यात त्यांनी ६ वा क्रमांक पटकावला. ह्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक व चर्चा न झाली तरच नवल. घरात शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, ना अभ्यासासाठी कोणत्या सुखसोयी व साधने, तरीही केवळ, आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले.

संदीप ह्यांच्या यशात त्यांच्या आई – वडिलांचे फार मोठे योगदान आहे. घरी बिकट परिस्थिती असतांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाला त्यांनी काही कमी पडू दिले नाही. मिळेल ते काम करून त्यांनी मुलांना शिक्षण शिकवले व संदीप गुरव ह्यांनी अगदी चांगल्या प्रकारे त्या कष्टाचे चीज केले असे आपणास म्हणावे लागेल. संदीप ह्यांचा धाकटा भाऊ सचिन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यानेही स्पर्धा परीक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. संदीप ह्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण गारगोटी इथल्या कर्मवीर हिरे कॉलेजात झाले, तर त्यांचे शालेय शिक्षण पाल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेले आहे.

दोन वेळा अपयश येऊनही जिद्द न सोडता अभ्यास करत राहिल्यामुळे अखेर तिसऱ्या प्रयत्नात संदीप ह्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अवघड विषय वगळता, इतर सर्व विषयांची तयारी त्यांनी घरीच केली. यशाचा हा प्रवास इथेच थांबणार नसून भविष्यात, आपला अभ्यास सुरूच ठेवण्याचा व आयपीएस अधिकारी बनण्याचा मनोदय आहे, असे संदीप ह्यांनी सांगितले. भुदरगड तालुक्याचे सुपुत्र असलेले संदीप गुरव ह्यांचा एक वेटर ते पोलीस उपमहानिरीक्षक बनण्याचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.