fbpx

राजकारणात करिअर करायचं आहे ? या कॉलेजमध्ये मिळतेय शिक्षण आणि डिग्रीसुद्धा

लहानपणी शाळेत तुम्हा आम्हा सर्वांना एक प्रश्न नक्की विचारला गेला आहे आणि आत्ताही लहान मुला मुलींना हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मोठे होऊन काय काय होणार ? मग कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी अगदी अमिताभ बच्चन असे ही उत्तरं देत असत. आताची मुलं कदाचित याहून वेगळे उत्तरं देत असतील पण ती प्रतिष्ठेचे वाटणारेच क्षेत्र निवडतात आणि सांगतात. पण कीती मुले म्हणतात की मला मोठे होउन राजकारणी व्हायचंय ? किंवा किती मुलांचे पालक (राजकारणी सोडले तर) आपल्या मुलांना राजकारणात करीअर करण्याचा सल्ला देतात ?

ह्याचे कारण असे की राजकारण हे क्षेत्र बदनाम तर झालेच आहे, त्यातही इथे सामान्य माणूस काही करु शकत नाही, इथे ओळख आणि राजकारणी घराण्यात जन्म घ्यावा लागतो हा समज देखील सामान्य माणसांमध्ये आहे आणि तो काही प्रमाणात खरा देखिल आहे. पण जर मी तुम्हाला सांगितल की ज्या प्रकारे डॉक्टर, इंजिनिअर ह्यात करीअर करण्यासाठी मुलांना शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये व शिक्षणसंस्था असतात तसेच मुलांना राजकारणाचे धडे देणारीही शिक्षणसंस्था आहेत तर तुम्ही काय म्हणाल ?

राजकारणात करिअर

हो. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ह्या शिक्षणसंस्थेमार्फत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडरशिप (Indian Institute of Democratic Leadership) ही संस्था आता राजकारणात करीअत करु इच्छिणाऱ्या तरुणांना राजकारण आणि लोकशाहीचे धडे देण्यास सज्ज झाली आहे. अनेक विद्यार्थी येथे राजकारणाचा, समाज कारणाचा आणि लोकशाहीचा अभ्यास करत आहेत. अतिशय दुर्मिळ अश्या अभ्यासक्रमांपैकी एक असा हा अभ्यासक्रम आहे. राजकारण हा फक्त कट्ट्यावर गप्पा मारण्याचा किंवा फावल्या वेळेत सगळ्याच गोष्टींना “सिस्टीम”ला जबाबदार धरण्याचा विषय नसून गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. “सिस्टीम” मध्ये घुसुन राजकारणासोबत समाजकारण करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही संस्था एक उत्तम व्यासपीठ आहे.

आजचा तरुण आपल्या हक्क आणि कर्तव्याबद्द्ल पुर्वीपेक्षा अधिक जागृत झालाय. २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच पार पडलेल्या २०१९ च्या निवडणुकीत भारतीय तरुणांनी खुप मोठा सहभाग नोंदवला. सोशल मिडीया मार्फत तरुण पीढी आपले मत वारंवार मांडत असतात. पण ह्या मतांना जर संपूर्ण माहीती उपलब्ध असेल तर ते आणखी प्रगल्भ होतात. सर्वच तरुणांना लोकशाही तत्वांची, तिच्या इतिहासाची आणि तिच्या आजच्या परीस्थीतीची व तिच्या गरजेची जाण असेलच असे नाही. ही जाण इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडरशिप ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना करुन देण्यास मदत करेल.

समाजाचा अभ्यास हा समाज सक्षम करण्यासाठी महत्वाचा असतो तो अभ्यास इथल्या विद्यार्थ्यांना करणे शक्य होते आहे. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन, राजकारण आणि लोकशाही, प्रशासन आणि जन धोरण ह्या त्रिसुत्री अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना राजकारणाचे, समाजकारणाचे आणि प्रशासकीय धोरणांचे धडे उत्तमरीत्या देण्याचे कार्य ही संस्था करते. ह्या प्रत्येक विषयाला सारखेच महत्व दिले जाते व त्यावरच परीक्षा घेतली जाते. एकंदरीत आपल्या भारतीय लोकशाहीची, समाजव्यवस्थेतील सत्यतेची ओळख करुन देउन, त्यातल्या जाणीवा जागृत करुन लोकाभिमुख नेता घडवला जातो ह्याची जाण ह्या संस्थेच्या चालकांना आहे.

इथले विद्यार्थी काय म्हणतात ?

इथे शिक्षण घेतलेला आदित्य छाप्रा हा तरुण म्हणतो की आय.आय.डी. एल. (IIDL) ने मला राजकीय दृष्टीकोण आणि सामाजिक विषयाची ओळख करु दिली, जे सामाजिक जीवन बनविण्यासाठी खुप महत्त्वाचे आहे. मला वाटतं ही सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आय.आय.टी. च्या दर्जाची संस्था आहे.

तर इथला विद्यार्थी अभिमन्यू रावचे म्हणणे आहे की आय.आय.डी.एल. मधे येण्याआधी मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबद्दलची माहीती फार तोडकी होती. इथे आल्यानंतर मला राजकारणाच्या आणि नेतृत्वाच्या विविध अंगांची सखोल माहीती मिळाली आणि इथला कॅम्पस व इथला कर्मचारी वर्ग हे माझे दुसरे घर आहे अशी वागणूक देत होता.

हेना केनी नावाची विद्यार्थिनी म्हणते की मला वाटायचं मला सर्व काही माहीत आहे पण इथे येताच माझे डोळे उघडले आणि मला समजले की माझ्या देशाबद्दल अश्या अनेक गोष्टी होत्या ज्या मला माहीतीच नव्हत्या.

एका छोट्या गावातुन आलेले सरपंच म्हणतात की मला इथे आल्यावर एक खुप मोठे व्यासपीठ मिळाले. माझे व्यकीमत्व बदलले आणि लोकांशी संवाद साधण्याची कलाही विकसित झाली आणि अधिक लोकांपर्यंत मी पोहचु शकलो.

या अभ्यासक्रमात काय काय शिकाल ?

वर असलेल्या विद्यार्थ्याच्या उदाहरणांवरुन तुम्हाला लक्षात आले असेल की राजकारणात येउ इच्छिणारे, समाजकार्य करु इच्छिणारे, पत्रकारीता करु इच्छिणारे, स्वयंसेवी संस्था चालवून समाज घडवु पाहणारे आणि ते सर्वंच ज्यांना आपल्या गाव, शहर, राज्य आणि देशाविषयी कळवळा आहे ते सर्वच इथे भाग घेऊ शकतात. इथे तुम्हाला मुरलेले राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व अनुभवी पत्रकार संबोधित करतात. लोकशाही व्यवस्थेची माहिती व्हावी ह्यासाठी ग्रामपंचायतीपासून ये लोकसभेपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष नेले जाते. माहीती अधिकार याचिका व जनहीत याचिका कशी दाखल करतात ह्याचे प्रशिक्षण दिले जाते.

कामाचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष राजकारण्यांसोबत, स्वयंसेवी संस्थांसोबत, खासदार व आमदारांसोबत काम करण्याची संधी देउन दिला जातो. लोकसभा प्रतीकृती व युनायटेड नेशन्स प्रतीकृती तयार करुन तिथल्या कामाचाही प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. देशाला व समाजाला भेडसवणाऱ्या समस्यांवरचे चित्रपट व माहीतीपट इथे दाखवले जातात ज्याने प्रश्नांचे गांभीर्य जाणीवेत राहते.

अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती

नउ महिन्यांच्या या अभ्यासक्रमासाठी ३० मुले निवडले जातात. ह्या अभ्यासासाठी पदवीधर असणे हि पुर्वअट आहे. प्रवेशअर्जा साठी १०००/- रुपये फी आहे, तर संपूर्ण अभ्यासक्रमासाठी २,२५०००/- रुपये फी आहे. इथे राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था केली जाते त्यासाठी ७५०००/- इतकी रक्कम फी म्हणून भरावी लागते, तर १००००/- रुपये अनामत रक्कम म्हणून स्विकारली जाते. इथले वर्ग हे वातानुकूलित व दृक-श्राव्य व्यवस्था असलेले आहेत, तर त्याच सोबत फ्री वायफाय सेवा ही पुरवली जाते. मेसची ही व्यवस्था करण्यात येते व सोबतच जलतरण तलाव देखिल आहे. विद्यार्थांना उत्तम मनाची जडणघडण करण्यासोबतच शरीरही सुदृढ ठेवण्यासाठी इथे व्यायामशाळा ही आहे आणि त्याच बरोबर विविध खेळही खेळण्याची व्यवस्था आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही १९८२ ला सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्वगुण निर्माण करण्याच्या हेतुने स्थापण झाली होती. २०१७ मध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडरशिपची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. मुंबई बाहेर भाईंदरच्या ठिकाणी १५ एकरवर ह्याचे उत्कृष्ट कॅंपस पसरलेले आहे. राजकारण आणि समाजकारण ही गांभीर्याने करावयाची गोष्ट आहे असे तुम्हाला वाटत असेल आणि ह्यात करीअर करावे असे तुम्हाला वाटत असेल तर एकदा ह्या आय.आय.डी.एल. ला नक्कीच भेट द्या.

या कोर्सला ऍडमिशन घ्यायची असल्यास इथे नोंदणी करा iidl.org.in/apply-now/

Leave A Reply

Your email address will not be published.