fbpx

मुंबईची जीवन वाहिनी बाँम्ब स्फोटानी हादरवणारी ‘ती’ भयंकर संध्याकाळ

स्वप्नांची नगरी, माया नगरी, सर्वाना सामावून घेणारी मुंबापुरी, देशाची आर्थिक राजधानी, आणि महाराष्ट्राची राजधानी असलेले हे शहर म्हणजे मुंबई. या मुंबईवर सतत दहशतवादी हल्यांचे सावट असते. मुंबई हि भारतासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने, मुंबईत झालेल्या घटनेचे दूरगामी परिणाम, देशाच्या आर्थिक, राजकिय आणि सामाजिक उलाढालींवर होत असतात, त्यामुळे छुपे वार करण्यात पटाईत असणाऱ्या दहशतवाद्यांना गर्दीच्या ठिकाणी हल्ले करून भारतातील शांतता, एकी आणि स्थिरता कमकुवत करायची असते. त्यामुळे देशात कुठेही काही झाले, तरी लगेच मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येते. हाय अलर्ट जारी करून मुंबईचे विमानतळ, सार्वजनिक ठिकाणे आणि सर्व रेल्वे जाळे सुरक्षित करण्यात येते.

देशासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या अश्या ह्या मुंबईची life line म्हणजे मुंबईच्या सगळ्या टोकांना जोडणारी आणि सतत धडधडत राहणारी “लोकल ट्रेन”, मुंबईत राहणारा मनुष्य ह्या लोकलच्या जीवावर, मुंबईच्या एका टोकावर घर घेऊन सुद्धा कामाचे ठिकाण असलेल्या दुसऱ्या टोकावर वेळेवर पोहोचतो. मुंबईकरांच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्याचा मिनिटा – मिनिटाचा हिशोब ह्याच लोकलच्या टाईम – टेबल वर अवलंबून असतो. सामान्य चाकरमानी असो की मुंबईचा डबेवाला असो, सगळ्यांनाच ही लोकल एक वरदान आहे.

mumbai local bombing, 13 march 2003, 2003 train bombing, attack on mumbai, bomb blast in mumbai
(Source – telo.org)

पण अनेकदा ह्याच लोकलला दहशतवाद्यांची दृष्ट लागते आणि ही लाईफ लाईन कधीकधी मरणाची पेटी होऊन जाते. मुंबईकरांनी असे अनेक हल्ले पचवून परत आपले जीवन सुरळीत केले आहे, पण तरीही हे हल्ले आणि त्यांच्या आठवणी मुंबईसह सर्व देशवासीयांच्या मनात खोलवर घरं करून राहतात. अशीच दुर्घटना घडली होती, दिनांक १३ मार्च २००३ ह्या दिवशी. ह्याच दिवशी लोकलमध्ये झालेल्या स्फोटात १० लोक ठार झाले होते. त्या बद्दलची सविस्तर माहिती अशी…

१३ मार्च २००३ रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजता मुंबई लोकल रेल्वेमधील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्ब्याजवळ झालेल्या स्फोटात चार महिलांसह दहा प्रवासी मारले गेले होते, तर तब्बल ७० जण जखमी झाले होते. सदर घटना जेव्हा घडली तेव्हा ही लोकल मुलुंड स्टेशनमध्ये दाखल झाली होती. रेल्वे पोलिसांनी ह्या बाबत सूत्रांना असे सांगितले होते की, स्फोटात दहा लोक मृत्युमुखी पडले, ज्यात सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश होता. ठार झालेले लोक शेजारच्या द्वितीय श्रेणीतील डब्यात बसले होते.

mumbai local bombing, 13 march 2003, 2003 train bombing, attack on mumbai, bomb blast in mumbai
(Source – thehindu.com)

स्फोटामुळे हा डब्बा पूर्ण बेचिराख झाला होता. ठार झालेल्यांपैकी दोन पुरुष, पोलिस कॉन्स्टेबल होते, असेही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होतं. जखमींना ताबडतोब मुलुंड जनरल हॉस्पिटल आणि काहींना सायन येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलुंड हॉस्पिटलमध्ये जखमींना भेटायला भुजबळ गेले होते, तसेच ठार झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना, २ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली होती. सुमारे १०० पेक्षा जास्त प्रवासी बाजूच्या उध्वस्त झालेल्या डब्यामध्ये होते, त्यामुळे नक्कीच जखमींचा आकडा अजून जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

जखमीमधील बहुतेकांना डोके तसेच कंबरेच्या वरच्या भागात जबर मार बसून जखमा झाल्या होत्या. ही लोकल, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSTM) कडून कर्जतकडे जात होती. ह्या घटनेनंतर मध्य – रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली, तसेच जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना बऱ्याच वेळ थांबवून ठेवण्यात आले होते. ह्यात अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोटांना १० वर्ष पुर्ण होऊन फक्त एक दिवस झालेला असताना म्हणजे दुसऱ्या दिवशीच हा स्फोट घडवून आणला होता.

mumbai local bombing, 13 march 2003, 2003 train bombing, attack on mumbai, bomb blast in mumbai
1993 serial bomb blast Mumbai(Source – livemint.com)

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत तब्बल एक डझन साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या स्फोटात २५७ जण ठार तर ७१३ जण जखमी झाले होते. आज ह्या घटनेला घडून २५ वर्षे उलटून गेली, पण या स्फोटांसाठी जबाबदार असलेल्यांना अटक आणि तपास अजून चालूच आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ह्या साखळी बॉम्बस्फोटामागचा म्होरक्या असून सुद्धा तो शेजारील देशात आरामात राहत आहे. आपल्या शेजारील देशाची आतंकवाद्यांना आश्रय व मदत देण्याची वृत्ती असल्याने सामान्य जनतेचा हकनाक बळी अश्या प्रकारच्या हल्ल्यात जातो, तसेच प्रचंड प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान होते.

भारताची आर्थिक राजधानी आणि ह्या आर्थिक राजधानीची “जीवनवाहिनी” असलेली मुंबई लोकल अधिकाधिक सुरक्षित बनविणे आवश्यक आहे, म्हणजे मागील अनेक दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. भारत सरकार नेहमी लोकलचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतच असते, पण मुंबई शहराची वाढलेली लोकसंख्या व लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची वाढती संख्या, ह्यामुळे सरकारचे अनेक उपाय तोकडे पडताना दिसत आहेत. ह्यावर कायमस्वरूपी व ठोस उपाय योजने आवश्यक आहे व त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.