fbpx

“पुणे हे विद्येचे माहेरघर” असं म्हणणाऱ्यांना, पुण्यावर झालेल्या ह्या अन्यायाची कल्पना आहे ?

पुण्यात असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था व पुण्यातील शिक्षणाचा उच्च दर्जा ह्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की त्यांनी पुण्याला, “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” ही उपमा देऊन पुण्याचा गौरव केला.

शिवकालीन इतिहास असो अथवा भारताला ब्रिटिश राजवटीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उभारण्यात आलेला स्वातंत्र्य संग्राम असो, पुणे हे नेहमीच अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आले आहे. तो काळ होता 1950 चा. जवाहरलाल नेहरू पुण्याला आले होते. पुण्यात असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था व पुण्यातील शिक्षणाचा उच्च दर्जा ह्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की त्यांनी पुण्याला, “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” ही उपमा देऊन पुण्याचा गौरव केला.

ओक्सफर्डची ख्याती जगभरात पसरली आहे, पुण्याला पूर्वेकडील ओक्सफर्ड असे संबोधित करणे ही तत्कालीन पुणेकरांना व आजच्या पुणेकरांना सुध्दा भूषणावह वाटेल अशी बाब, पण एवढं सगळं असूनही, आजही पुण्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित असे एकही इन्स्टिट्यूट गेल्या कित्येक वर्षात उभे राहिलेले नाही. ज्या पुण्याला विद्येचे माहेघर म्हटले जाते, ज्या पुण्यामध्ये देश व विदेशातील कित्येक मोठ्या कंपन्यांनी अब्जो रुपयांची गुंतवणूक केली व देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात स्थायिक होत आहेत.

(Source – citytoursindia.com)

राहण्यासाठी सर्वात आदर्श ठिकाण जर संपूर्ण देशात कुठे असेल तर ते पुण्यात आहे. सरकारने केलेल्या सर्व्हेमध्येच हे स्पष्ट झाले होते कि राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुण्याचा प्रथम क्रमांक आहे. सगळं आहे पुण्यामध्ये, पण तरीसुद्धा पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिक्षण संस्था मग ती आयआयटी असो किंवा आयआयएम का नाही ? ह्याचं उत्तर पुण्यातील खासदाराने द्यायलाच हवे.

पुण्यामध्ये देशातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेले COEP अर्थात कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ज्याची स्थापना १८५४ साली झाली होती, फर्ग्युसन कॉलेज जिथे भारतातील अनेक महान व्यक्तिमत्वांनी आपले शिक्षण पूर्ण केले असे नामांकित कॉलेज व एफटीआयआय (FTII) जिथे अनेक दिग्गज सिनेकलावंतांनी अभिनयाचे धडे गिरवलेत, ह्याशिवाय अनेक उच्च गुणवत्ता असलेली महाविद्यालयं आहेत. सुमारे ५०० शैक्षणिक संस्था व कॉलेजेस व तिथे शिकणारे ५ लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी, हे सर्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येतात.

पुणे युनिव्हर्सिटीचा नावलौकिक ऐकून बाहेरच्या देशातून विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात, पण ज्या पुण्याची किंमत बाहेरील देशातील लोकांना आहे, त्या पुण्याची किंमत आमच्याच लोकप्रतिनिधी व सत्ताधार्यांना नाही, असे म्हणावे लागेल. कारण, २००६ पासून २०१९ पर्यंत एकही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था पुण्यात सुरु झाली नाही. पुण्यात स्थापन करण्यात आलेली शेवटची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्था म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च अर्थात IISE R, जी काँग्रेसच्या शासन काळात स्थापन करण्यात आली होती.

(Source – ehealth.eletsonline.com)

म्हणजेच तब्बल १३ वर्षं झाली, पुण्यात एकही राष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था सुरु होऊ शकली नाही, ह्याचे उत्तर कोण देणार ? हा पुण्यावरील अन्याय पुणेकर निमूट सहन करत आहेत, कारण, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना पुणेकर जनतेने दणदणीत मतांनी निवडून दिले त्यांनी पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रासंबंधी होणाऱ्या कुचंबणेला ना संसदेत वाचा फोडली, ना राज्य शासनाकडे वरील बाबी मांडल्या.

२०१४ साली सत्तेत आलेल्या भाजप सरकारने ६ नवीन आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली ज्यातील १ आयआयएम महाराष्ट्राच्या वाट्याला येणार होते, व साहजिकच ह्या महाराष्ट्रात नव्याने तयार होणाऱ्या आयआयएमसाठी पुण्याहून दुसरी उत्तम जागा, पुण्याहून दुसरे उत्तम ठिकाण दुसरे नव्हतेच, हा आमचा दावा किंवा पुण्याप्रती असलेले आमचे प्रेम ह्यामुळे नसून त्याला तशी सबळ करणं सुद्धा आहेत.

आयआयएमसाठी(IIM) पुणेच योग्य का ?

आयआयएम हे पोस्ट ग्रॅज्युएशन व डॉक्टरेट ह्यासाठी असलेली संस्था आणि त्यासाठी अर्थातच ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. हजारो विद्यार्थी पुण्यात येऊनच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, कारण, पुणे विद्यापीठ व पुण्यातील कॉलेजेस ह्यांची उच्च शैक्षणिक गुणवत्ता, तसेच हे विद्यार्थी आपले ग्रॅज्युएशन करता करता आयआयएममध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात एंट्रन्स टेस्टची (CAT) तयारी करण्यासाठीही पुण्यालाच पसंती देतात. म्हणजेच आयआयएम प्रवेशाआधीची विद्यार्थ्यांची पसंद पुणेच असते, कारण पुण्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, व पुण्याचे सर्वार्थाने राहण्यायोग्य असलेले वातावरण.

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, पुण्यात असलेले उद्योगधंदे व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या. उत्पादन क्षेत्र असो अथवा माहिती तंत्रज्ञान (IT sector) नामांकित कंपन्यांनी पुण्यात आपला उद्योग केवळ सुरूच केला नाही तर त्यातील गुंतवणुकीतही वाढ केली आहे. ज्यामुळे साहजिकच ह्या मोठमोठ्या कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे आणि जर आयआयएम पुण्यात झाले असते तर ह्या कंपन्यांसाठीही ते फायद्याचे ठरले असते व आयआयएममध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही. कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण व उत्तम रोजगार संधी ह्याचा सुंदर मेळ ह्यामुळे आपल्याला पुण्यात पाहायला मिळाला असता, पण पुण्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी ह्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली नाही व पुण्यासाठी असणारी हि सुवर्णसंधी गमावली आणि आता हेच आयआयएम पुण्यातून नागपूरला हलवण्यात आले आहे.

Groundbreaking ceremony for IIM Nagpur (Source – Nagpur Today)

नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या आयआयएमसाठी पुणे सर्वार्थाने योग्य शहर असतांना ते नागपूरला हलवण्याचे का ठरले ? कारण अगदी सोपं आणि सर्वाना दिसणारं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे व विद्यमान केंद्र सरकारमधील एक वजनदार मंत्री ते सुद्धा नागपूरचेच व त्यांच्या दबावामुळे पुण्याला होणारे आयआयएम नागपूरला हलवण्यात आले आणि पुण्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी ह्याचा साधा निषेधही केला नाही ना आपला आवाज उठवला.

पुण्यात होऊ शकले असते असे आणखीन एक राष्ट्रीय दर्जाचे इन्स्टिट्यूट म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अर्थात (NLU). सध्यस्थितीला भारतात एकूण २५ NLU आहेत ज्यातील ३ NLU हे महाराष्ट्रात आहेत (मुंबई, औरंगाबाद, नागपूर). पण, बऱ्याच लोकांना हे माहित नसेल कि औरंगाबाद इथे असलेले NLU पुणे इथे स्थापन होणार होते आणि ह्याही वेळी तेच कारण होते, निष्क्रिय लोकप्रतिनिधी. तुम्ही सत्ताधारी पक्षातील खासदार असूनही आपल्या शहरावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नसाल तर तुमच्या संसदेमध्ये असण्याचा उपयोग काय असा सवाल एका सामान्य पुणेकर तरुणास पडला तर त्यात वावगं काय ?

जसं आयआयएम पुण्यातच स्थापन होणे कसे योग्य होते ह्याची कारणे जशी आम्ही सांगितली, तसेच NLU सुद्धा पुण्यात होणेच का योग्य, ह्याचीही काही कारणे आहेत. एकतर पुण्यामध्ये विविध न्यायसंस्था जसे कि, पश्चिम विभागातील हरित लवाद (हरित प्राधिकरण), जिल्हा न्यायालय जिथे १० दशलक्ष लोकांचे खटले चालवले गेले व निकाली काढले गेले व तसेच भारतातील अनेक इतर अग्रगण्य न्यायदानासंबंधी संस्था आहेत, त्यामुळे पुणे हा औरंगाबादपेक्षा योग्य पर्याय होता. परंतु पुण्यातील लोक लोकप्रतिनिधींनी पुण्याच्या हितसंबंधीच्या प्रश्नांवर बोलायचेच नाही असे ठरवलेले दिसते, म्हणून आयआयएम प्रमाणेच NLU हि राष्ट्रीय स्तरावरील एक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात स्थापन होऊ शकली नाही किंवा पुण्याच्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे ती झाली नाही असे आपल्याला म्हणावे लागेल.

जर आपण असेच निष्क्रिय लोकप्रतिनिधी जे पुण्याच्या विकासासाठी आवाज उठवणार नाहीत, असे लोक निवडून देणार असू तर, पुण्याचा विकास, पुणेकरांच्या समस्यांची सोडवणूक ह्यासंबंधी बोलणे व्यर्थ ठरेल. जर अश्याच प्रकारच्या नामांकित संस्था पुण्यात येऊ दिल्या गेल्या नाहीत तर पुण्याला मिळालेले “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” हे नाव व हे बिरुद, शाबूत राहील का ? विद्येचे माहेरघर असा लौकिक असणाऱ्या पुण्याचा शैक्षणिक दर्जा उंचावेल का पुण्याच्या प्रगतीचा आलेख मंदावेल ? असे प्रश्न एक मतदार म्हणून स्वतःला विचारायला हवेत, अन्यथा पुण्याच्या अधोगतीस कारणीभूत आपणच असू

पुण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील दुष्काळ संपवायचा असेल तर एक सुजाण पुणेकर ह्या नात्याने, एका योग्य व्यक्तीस लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवणे हेच पुण्याच्या भविष्यासाठी योग्य ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.